Home Cities जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी भाषेचे महत्त्व, मराठी शाळांची ओळख आणि त्यांची सद्यस्थिती प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचा विशेष खेळ जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ चित्रपट पाहण्याचा आनंदच मिळाला नाही, तर मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण करणारा अनुभवही मिळाला.

या विशेष खेळाला आणखी वेगळे महत्त्व लाभले ते म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी स्वतः थिएटरमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहण्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होता.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कलाकारांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून दिले. “मराठी भाषा जगवा, मराठी शाळा टिकवा,” असा मोलाचा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत मराठी शाळांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले.

अनेक विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव आणखी खास ठरला कारण अनेकांनी पहिल्यांदाच वातानुकूलित थिएटरमध्ये चित्रपट पाहिला. चित्रपटासोबतच मुलांसाठी अल्पोपहार आणि शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. चित्रपट पाहण्याचा आनंद आणि खाऊ-पिण्याची मेजवानी यामुळे मुलांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

या उपक्रमामागे अर्चना राणे यांचा विशेष पुढाकार महत्त्वाचा ठरला. विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागवणे आणि मराठी शाळांविषयी सकारात्मक भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. “मराठी भाषा अभिजात झाली आहे, मात्र मराठी शाळा कधी अभिजात होणार?” हा विचारप्रवर्तक प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला.


Protected Content

Play sound