Home Cities जळगाव शहरातील महामार्ग व समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई 

शहरातील महामार्ग व समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गावर वाढत चाललेला अपघातांचा धोका लक्षात घेता शहरातील मुख्य महामार्ग तसेच त्यावरील समांतर रस्ते तात्काळ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश महापौर दीपमाला काळे यांनी दिले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत ही कारवाई पूर्ण करून रस्ते पूर्णपणे मोकळे करण्याचे निर्देश महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने बैठक घेऊन अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांवर टाकण्यात आलेले बांधकामाचे वेस्ट मटेरियल उचलण्याचे कामही महापालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर साचलेले बांधकाम साहित्य व इतर अडथळे हटविल्यानंतर वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय शहरातील प्रमुख व्यापारी संकुलांची स्वच्छता मोहीमही राबविण्याचे आदेश महापौरांनी स्वच्छता विभागाला दिले आहेत. व्यापारी भागात स्वच्छता राखली जावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. व्यापारी संकुल परिसरात कचरा किंवा अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

यासंदर्भात लाईव्ह ट्रेंड्सशी बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, शहरातील रस्ते मोकळे ठेवणे आणि वाहतूक सुरक्षित करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यासोबतच स्वच्छतेवरही विशेष भर दिला जात आहे. जर दुकानदारांकडून परिसरात स्वच्छता राखली जात नसल्याचे आढळून आले, तर संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.


Protected Content

Play sound