बीड वृत्तसंस्था । जानेवारी महिन्यात भगवान बाबांची पुण्यतिथी होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या मोठ्या भावाशी रक्ताचे नातं तोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे स्वाभाविक आहे की, पक्षामध्ये काहीच स्थान राहिले नव्हते. त्यामुळे मला तो निर्णय घ्यावा लागला, असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच परळीत आले आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला अतापर्यंतचा प्रवास उलगडला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाच्या प्रवासाबद्दल बोलताना भावूक झालेले आज पहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी २०१२ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर सात वर्षांनी ते मंत्री झाले आहेत. ‘जानेवारी महिन्यात भगवान बाबांची पुण्यतिथी होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या मोठ्या भावाशी रक्ताचं नातं तोडण्याची भाषा केली होती. पक्षात काहीच स्थान राहिलं न राहिल्याने तो निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. बेईमान, गद्दार, खलनायक म्हणून पाच वर्ष बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मी वावरलो. त्यानंतर आता ही जबाबदारी मिळाली आहे’, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
‘उशिरा का होईना सत्याचा विजय झाला, सत्याच्या मागे नियती उभी राहिली याचा आनंद आहे. हा इमानदारीचा चमत्कार आहे’, अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी परळीकरांना, बीडकरांना निवडणुकीत जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच परळी-बीडच्या जनतेचे उत्पन्न दुप्पट करणे हे माझे ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.