मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ते अलीकडेच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून हजारो लोकांच्या थेट संपर्कात आलेल्याने आता त्या सर्वांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे.
जयंत पाटील यांनी अलीकडेच चंद्रपूर ते जळगाव अशा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा पहिला टप्पा पार केला आहे. यात ते हजारो नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्यांच्या संपर्कात आलेले आहेत. आता जयंत पाटील हे पॉझिटीव्ह झाल्याने या सर्वांनाही संसर्गाचा धोका असून त्यांनी चाचणी करणे अपेक्षित आहे. तर जळगाव जिल्ह्यातील नेते व पदाधिकारी देखील त्यांच्या संपर्कात आलेल्याने त्यांना देखील चाचणी करावी लागणार आहे.