मुंबई प्रतिनिधी । जळगावातील आशादीप महिला वसतीगृहात सांगत येत असलेला प्रकार घडलाच नसल्याची माहिती समितीने केलेल्या चौकशीतून समोर आल्याची माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगावातील आशदीप महिला वसतीगृहातील कथित व्हिडीओ प्रकरण चांगलेच गाजत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच उच्च स्तरीत समितीचे गठन करून चौकशी करून दोन दिवसात अहवाल मांडण्यात येईल असे जाहीर केले होते.
या अनुषंगाने आयएएस अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखालील समितीने काल सकाळी दहापासून रात्री उशीरापर्यंत चौकशी केली. यानुसार आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन दिले. यात म्हटले आहे की, त्या वसतीगृहात काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. त्यात काही महिला गाणी म्हणत होत्या.त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा त्रास होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला. याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांकडून महिलांना नग्न नाचवण्यात आल्याची केलेली तक्रार खोटी असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. यात आरोप करण्यात येत असलेला प्रकार झालाच नाही. यामुळे हे प्रकरण कपोलकल्पीत असल्याचे गृहमंत्री म्हणाले. तर, या प्रकरणी अफवा पसरवणार्यांवर कारवाई होईल असेही गृहमंत्री म्हणाले.
यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली? अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सांगितलं की, “१७ महिलांना कविता म्हणण्याचं, गाणी गाण्याचं बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या”.
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी १७ पैकी पाच मुली १८ वर्षाच्या खालील असूनदेखील त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची बातमी खरी आहे का ? अशी विचारणा केली. यावर अनिल देशमुख यांनी हे वृत्त चुकीचं असून हे मुलींचं नाही तर महिलांचं वसतिगृह असल्याची माहिती दिली.