मुक्ताईनगर प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून केळी पीक विम्याच्या बदललेल्या निकषामुळे दोन वर्षात विम्याच्या रक्कमेत २६ हजार रुपयांची हेक्टरी तफावत आहे. ही रक्कम शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना द्यावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे वादळी वार्यासह झालेल्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याआधीच निकषात बदल केल्याने गेल्या वर्षापेक्षा या वर्षी केळी फळ पीक विम्याची मिळणारी मदत सरकारने कमी केली आहे.त्यामुळे या दोन वर्षात विम्याच्या रक्कमेत २६ हजार रुपयांची हेक्टरी तफावत आहे. ही रक्कम शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना द्यावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री, कृषी मंत्री , मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्गाच्या प्रकोपामुळे केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी फळ पीक विम्याच्या निकषात यावर्षी बदल केल्याने त्याचा लाभ शेतकर्यांना फारसा होणार नाही. मात्र गत वर्षी व यंदाच्या मिळणार्या आर्थिक भरपाईच्या रक्कमेत २६ हजारांची हेक्टरी तफावत असल्याने यापूर्वी हा विषय राज्य सरकार पुढे आलेला होता. त्यावेळी शेतकर्यांना तफावतीची रक्कम राज्य सरकार देईल असे सांगितले होते. विमाधारक नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकर्यांना ही रक्कम शासनाने द्यावी. तसेच जिओ टागिंग ऐवजी कृषी व महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरण्यात अशी मागणी देखील एकनाथराव खडसे यांनी केली आहे.