मुक्ताईनगरातून रा.कॉ.च्या ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांची उमेदवारीतून माघार

muktainagar

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातले रा.कॉ., काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतल्याने खळबळ उडाली आहे. रवींद्रभैय्या पाटील यांनी मघार घेतल्यामुळे आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीचे आघाडीचे पुरस्कृत उमेदवार या मतदारसंघात राहणार आहेत.

हा मतदार संघ भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांचा प्रभाव असलेला मतदार संघ आहे. या आधी ॲड. पाटील यांना त्यांच्याकडून तीन-चार वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक लढण्यास अॅड.पाटील अजिबात उत्सुक नव्हते. त्यांनी जळगाव येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात स्पष्टही केले होते. मात्र पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. अखेर आज त्यांनी आपला अर्ज माघारी घेवून सगळ्यांना धक्का दिला आहे.

या मतदार संघातून आ.खडसे यांची कन्या रोहिणीताई भाजपतर्फे यंदा उमेदवार असून त्यांच्या विरोधात अॅड. पाटील हे विरोधी पक्षांचे उमेदवार होते. त्याचवेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आज माघारीच्या दिवशी महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. पाटील यांनी स्वत: माघार घेत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने येथील राजकारण ढवळून निघाले आहे. आधी भाजपने दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांना तिकीट नाकारल्याने हा मतदार संघ गाजत होता आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराने शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला पाठींबा दिल्याने पुन्हा एकदा येथील राजकारण चर्चेत आले आहे.

Protected Content