मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिंदे गटाचे मंत्री, आमदार व खासदार आज गुवाहाटी येते कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेले असतांना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र दौरा टाळला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री, आमदार, खासदार देखील आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील चिमणराव पाटील आणि किशोरआप्पा पाटील या दोन आमदारांचाही समावेश आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच सध्या जिल्हा दुध संघाच्या सुरू असलेल्या धावपळीमुळे आपण गुवाहाटी येथे जाणार नसल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील गुवाहाटी दौरा टाळला आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने त्यांना विचारणा केली असता आमदार पाटील म्हणाले की, येत्या दोन दिवसात मतदारसंघात खूप विवाह आहेत. यातच आमच्या निकटच्या आप्तांकडेही विवाह समारंभ आहे. यासोबत कामाचा खूप व्याप असल्याने आपण गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.