मुक्ताईनगर पोलीस स्थानकासाठी नवीन वास्तू उभारा : प्रहार जनशक्ती

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील पोलीस स्थानकासाठीची जागा अपुरी पडत असल्याने यासाठी भव्य वास्तू उभारावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. विवेक सोनवणे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

येथील पोलीस स्थानकासाठी नवीन भव्य वास्तू उभारण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, येथील पोलीस स्थानकाचे कामकाज अपुर्‍या जागेमध्ये सुरु आहे. येथे अपघातातील वाहने, अज्ञात वाहने, जुगार अड्ड्यावर धाडीत सापडले ली वाहने व इतर बाबीशी संबंधित वाहने उभे करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. पोलीस निरीक्षक यांचे स्वतंत्र कक्ष, उपनिरीक्षक यांचे स्वतंत्र कक्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे स्वतंत्र कक्ष, गोपनीय कक्ष, आवक जावक कक्ष व लॉकउप ई. साठी कम्पार्टमेंट करून कसेतरी काम भागवले जात आहे.

मुक्ताईनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण सुद्धा आहे. यामुळे येथे शहर, तालुका आणि ग्रामीण अशी तीन स्थानके होणे गरजेचे आहे. तसेच या तालुक्यातील ८१ खेड्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी येथी पोलीस स्थानकावर आहे. असे असताना कमी खोल्यांमध्ये प्रशासकीय कामकाज करीत असताना संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना तारेवरची कसरत करावी लागते असा आजवरचा अनुभव आहे.

मुक्ताईनगर शहरात जुने बस स्थानक रोडवरील जे.ई स्कूल लगत ८० च्या दशकापासून पोलीस क्वार्टर असून तेथेच डीवायएसपी ऑफिसचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी पोलीस मंगल कार्यालय आहे व ते सुद्धा रिकामे पडलेले आहे. या परिसरात जवळपास ५ एकर जागा आहे. असे असतांना स्वताची जागा उपलब्ध असून सुद्धा कोंदट जागेत कारभार होणे कितपत योग्य आहे ? असा प्रश्‍न यात विचारण्यात आलेले आहे.

या सर्व बाबींचा विचार करता शहर, तालुका आणि ग्रामीण असे तीन पोलीस स्थानके कार्यरत करून यासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे यांनी या निवेदनात केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस अधीक्षक जळगाव, जिल्हा अधिकारी जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

Protected Content