मुक्ताईनगर प्रतिनिधी । मांडूळ सापाची तस्करी करण्याच्या आरोपातून तालुक्यातील वढोदा येथील दोघांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील काही जणांना मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांनी मांडूळ साप विक्रीचे आमीष दाखविले होते. यानुसार हे दोन जण अजून काही जणांना सोबत घेऊन हिवरखेड येथे आले होते. दरम्यान हा सर्व प्रकार अमरावती पोलिसांच्या सायबर सेलला कळला होता. या अनुषंगाने अमरावती पोलिसांच्या एक पथकाने सापळा रचून अमोल महादेव हिवराळे ( वय २८) आणि लक्ष्मण उर्फ सोनू राजू खिरवळकर (दोन्ही राहणार वढोदा, ता. मुक्ताईनगर) यांना अटक केली. तथापि, त्यांच्या सोबत असणारे काही जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
मुक्ताईनगर तालुक्यात मांडूळ सापाची तस्करी, कथित नागमणी आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. यातच आता या नव्या प्रकरणाची भर पडली आहे.