मुक्ताईनगर पंकज कपले । तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे विना परवाना बसविलेला पुतळा पोलीस प्रशासन हटवत असतांना काही जणांनी दगडफेक केल्याचा गंभीर प्रकार घडला. यात दोन पोलीस जखमी झाले असून हा उपद्रव करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून येथील परिस्थती नियंत्रणात असल्याची माहिती आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर-बोदवड मार्गावर असणार्या निमखेडी खुर्द या गावात रात्रीच्या सुमारात अज्ञात लोकांनी महापुरूषाचा पुतळा स्थापीत केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संबंधीत पुतळा काढण्याचे काम सुरू केल्यानंतर काही काळ तणाव पसरला. यातच काही जणांनी दगडफेक सुरू केली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातील एका कर्मचार्याच्या छातीला वीट लागल्याने त्यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, दगडफेकीमुळे वातावरण चिघळत असल्याचे पाहून तातडीने अतिरिक्त कुमक पाचारण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणले. दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निमखेडी खुर्द गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून विना परवाना पुतळ्याबाबत नियम समजून सांगितले. यानंतर कडक बंदोबस्तात पुतळा काढण्यात आला.
निमखेडी खुर्द गावातील काही जणांनी केलेल्या दगडफेकीची चौकशी करण्यात आली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत असून ही प्रक्रिया सुरू झाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आजच्या घटनेत गावातील एका वृध्दाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर डॉ. मुंढे म्हणाले की, आज गावात एका वृध्दाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमखेडी खुर्द येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही डॉ. मुंढे यांनी नमूद केले.
खालील व्हिडीओत पहा या घटनेबाबत डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेली माहिती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/263415805128750