मुक्ताईनगर अंधारात : ‘हे’ आहे कारण; जाणून घ्या वीज केव्हा येणार !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात १३२ केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रातून वीज वाहून नेणारे दोन टॉवर कोसळल्याने शहरासह तालुक्यातील बहुतांश भागातील वीज गायब झाली असून ती लवकर येण्याची शक्यता धुसर असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आज सायंकाळच्या सुमारास हरताळा गावाजवळ १३२ केव्हीए क्षमतेच्या वीजेचे वितरण करणार्‍या दोन टॉवर कोसळले. सदर दोन्ही टॉवर ही खाली वाकले असून यात एक तर जमीनदोस्त झाला आहे. दोन्ही टॉवर कोसळल्यामुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये त्याच क्षणाला वीज पुरवठा खंडीत झाला.

दरम्यान, दोन्ही टॉवर परत उभे करून यातून विजेचे आधीप्रमाणेच वहन करण्यासाठी लागणारी यंत्रणा ही तातडीने उभी करणे अशक्य असल्याने मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आज रात्री वीज येणार नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने महावितरणचे अभियंता ब्रिजेश गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन टॉवर पडल्याने वीज गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तर संबंधीत कंत्राटदारांची दुरूस्त करणारी टिम आणि सोलरच बॅकअप वेळेवर आला तर उद्या दुपारपर्यंत वीज येऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली. अन्यथा, यापेक्षा जास्त वेळ देखील लागू शकतो असे ते म्हणाले. अर्थात, मुक्ताईनगरकरांची आजची रात्र अंधारात जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

Protected Content