अखेर मुक्ताईनगरला मिळाले तहसीलदार !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मुक्ताईनगरला अखेर आज तहसीलदार मिळाले असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मुक्ताईनगरच्या तत्कालीन तहसीलदार श्‍वेता संचेती यांची बदली झाल्यानंतर येथील तहसीलदारांचे पद रिक्त होते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या अनुषंगाने आज राज्य शासनाने मुक्ताईनगरच्या तहसीलदारपदी गिरीश वखारे यांची नियुक्ती केली आहे. ते नंदुरबार तालुक्यातील तळोदा येथे तहसीलदारपदी कार्यरत होते. आता बदली होऊन ते मुक्ताईनगरात रूजू होणार आहेत.

दरम्यान, आजच्या बदल्यांमध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील विजय बनसोडे यांची भडगाव तहसीलदार म्हणून बदली करण्यात आलेली आहे. तर, मुक्ताईनगर व भडगाव येथील नवनियुक्त तहसीलदार हे लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

Protected Content