मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव अॅपे रिक्षाने रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांना धडक दिल्याने ती उलटून यातील महिला ठार झाल्याची घटना आज घडली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आज दुपारी एक वाजेच्या सुमारास एमएच १९ एएक्स-३१६८ या क्रमांकाच्या अॅपे रिक्षा चालकाने भरधाव वेगाने रिक्षा आणत रस्त्यावर वाहनासाठी वाट पाहणार्या महिलांना जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या आशाबाई मनोहर महाजन, प्रणव श्रीराम महाजन, दिपाली उमाकांत तायडे व वत्सलाबाई भागवत पाटील हे प्रवासी जखमी झाले.
दरम्यान, प्रवाशांना धडक दिल्यामुळे सदर ऍपे रिक्षा उलटून यात बसलेली सीमा अविनाश पाटील ( वय ३५, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर ) ही महिला ठार झाली. या प्रकरणी रिक्षाचालक किशोर श्रीराम महाजन ( रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०४-अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ तसेच महाराष्ट्र मोटार अधिनियमातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.