मुक्ताईनगर प्रतिनिधी । तीन राज्यांमधील अतिशय महत्वाच्या शहरांना जोडणार्या Ankleshwar to Barhanpur अंकलेश्वर ते बर्हाणपूर या राज्यमार्गाला आता नॅशनल हायवेचा दर्जा मिळाला असून याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती संपन्न ग्रामीण भागातून जाणारा Ankleshvar to Barhanpur अंकलेश्वर – बुर्हानपूर राज्यमार्गाचे अखेर राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झालाचे रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने राजपत्राद्वारे जाहीर केले. या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होण्यासाठी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे ह्या मागील ७ वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करून प्रयत्न करीत होत्या. अखेर पाठपुराव्यास यश आल्याने खासदार रक्षाताई खडसेंनी आनंद व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.
४ फेब्रुवारी रोजी खासदार रक्षाताई खडसेंनी रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरधर अरमाने यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्याचे तसेच रस्त्याचे अवलोकन करून कमीतकमी दोन पदरी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे खासदार खडसे यांना आश्वासन दिले होते. अंकलेश्वर – बर्हाणपूर हा राज्यमार्ग असल्यामुळे सदर रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेस राज्यांकडून मिळणार्या निधीच्या कमतरतेमुळे बर्याच अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे सदर रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झालेली होती. परंतु सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने केंद्रामार्फत अत्याधुनिक पद्धतीने सुधारणा व दुरुस्ती करणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तळोदा – शहादा – शिरपूर – चोपडा – यावल ते रावेर या मार्गाने बुर्हानपूर अशा एकूण २४० किमी राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. तसेच लवकरात लवकर खासदार रक्षाताई खडसे या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना भेटून सदर महामार्गाचे काम मार्गी लागण्यासंदर्भात मागणी करणार असल्याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांच्या कार्यालयाने दिली आहे.