आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा : दोन रस्त्यांसाठी ८.९ कोटी रूपयांचा निधी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील दोन रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसण्या टप्प्यात ८ कोटी ९० लक्ष रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ नाबार्ड मालिका २८ अर्थसहाय्य अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय देण्याबाबत मान्यता मिळालेली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय क्रमांकः मुग्रायो-२०२२/प्र.क्र.५६९ परिपत्रक देखील निघालेला आहे.

या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ च्या नाबार्ड मालिका-२८ अर्थसहाय्य अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी नमुद केलेल्या अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केलेल्या पाठपुराव्याने मतदार संघातील दोन रस्ते सुमारे ८.९० कोटी रु. निधीसह मंजूर झालेले आहे.

याच्या अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील रा.म.मा.०६ ते भांडगुरा रस्ता (भाग लांबी सातोड – तरोडा- भांडगुरा ते तालुका हद्द रस्ता) व्हीआर -२१ (लांबी ७.२१० कि.मी.) या रस्त्यासाठी ५ कोटी ४० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर रावेर तालुक्यातील वाघोदे बुद्रुक ते कोचुर – सावखेडा – लोहारा रस्ता (टिआर- ०४, व्हिआर-८१६३,२५ ) यातील वाघोदे बू ते कोचर रस्ता (लांबी ३.५० किमी) या रस्त्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रूपये मिळणार आहेत.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील विविध विकासकामांना गती आली असून आता या दोन्ही रस्त्यांचे काम देखील लवकरच सुरू होणार असल्याने परिसरातील जनतेची मोठी सोय होणार आहे.

Protected Content