Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर पुनर्वसन टप्पा–४ ला तात्काळ मंजुरी द्या  – आ. एकनाथ  खडसे

मुक्ताईनगर पुनर्वसन टप्पा–४ ला तात्काळ मंजुरी द्या  – आ. एकनाथ  खडसे

0
193

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील पुनर्वसन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुनर्वसन टप्पा क्रमांक ४ ला तात्काळ मंजुरी देत निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच अतिक्रमित घरांच्या मोजणीसाठी लागणारे शुल्क शासनाने वहन करावे, अशी ठाम मागणी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.

आ. खडसे म्हणाले की, मुक्ताईनगर शहर हे हतनूर जलाशयाच्या बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात विस्थापित झालेले असून अजूनही जुन्या मुक्ताईनगर गावातील काही भागांचे पूर्ण पुनर्वसन झालेले नाही. शहराचे १०० टक्के पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून पुनर्वसन टप्पा क्रमांक ४ ला नियामक आयोगाची मंजुरीही मिळालेली आहे. तरीही प्रकल्पाला अद्याप शासनमान्यता व निधी प्राप्त झालेला नसल्याने काम ठप्प आहे. टप्पा–४ मधील घरांचे पुनर्वसन तातडीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, पुनर्वसित मुक्ताईनगर नगरपंचायत क्षेत्रात हजारो नागरिकांनी पूर्वीपासून अतिक्रमित जागांवर घरे बांधलेली आहेत. नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार या अतिक्रमणांचे नियमीतिकरण शक्य असून त्यासाठी सर्वेक्षणानंतर मोजणी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. मात्र मोजणीसाठी लागणारे शुल्क सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने ही प्रक्रिया रखडलेली आहे.

खडसे यांनी ठामपणे सांगितले की, शासनाने मोजणी शुल्क पूर्णपणे माफ करावे किंवा भूमी अभिलेख विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. यामुळे मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन अतिक्रमित घरे नियमीत होतील आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. शासनाच्या दुर्लक्षामुळे गेली कित्येक वर्षे नागरिकांना वाढत्या कागदोपत्री अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे यावेळी त्यांनी लक्षात आणून दिले.

मुक्ताईनगर शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी पुनर्वसन टप्पा–४ ची मंजुरी आणि अतिक्रमण नियमितीकरणासाठी शासनाची आर्थिक मदत अत्यावश्यक असल्याचे आ. खडसे यांनी सभागृहात अधोरेखित केले.


Protected Content

Play sound