मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचे जाहीर करून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा ४० तर अपक्ष १० आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. यानंतरच्या नाट्यमय घटनांमध्ये ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दरम्यान, आमदारांच्या पाठोपाठ खासदारांनीही बंडाचा पवित्रा घेतल्याचे मध्यंतरी दिसून आले होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेऊन एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचे जाहीर केल्याने खासदारांचे बंड शमल्याचे मानले जात होता.
मात्र काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली असून याबाबत झी-२४ तास या वाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आमदारांप्रमणेच शिवसेनेचे दोन तृतीयांश खासदार हे स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून याबाबत काल रात्री चर्चा झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.