मुंबई (वृतसेवा ) दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी पाठिंबा दिला आहे. त्यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचा जाहीर प्रचार केला आहे.
याबाबत मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले. देवरा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यामान खासदार अरविंद सावंत यांचे प्रमुख आव्हान आहे. देवरा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत अंबानी म्हणतात, ‘मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे.’ मुकेश अंबानी यांनी खूप कमीवेळा राजकीय भाष्य केले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अंबानींनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला होता. आता त्यांनी देवरा यांना पाठिंबा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.