पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम साहित्यिक रवींद्र पांढरे यांची ‘मुडकं कुंपण’ ही कादंबरी पुणे येथील रोहन प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे.
स्त्रियांच्या जगण्या भोवती समाजानं लादलेल्या नीती- अनीती ,नैतिकता यांच्या कुंपणा आत जगतांना स्त्रियांच्या आयुष्याची होणारी परवड हा मुडकं कुंपण या कादंबरीचा विषय आहे. दांभिक समाजात नीती-अनीती, नैतिकता यांच्या बंधनात प्रामुख्याने भरडली जाते ती अल्पशिक्षित, वंचित स्त्री. अशाच एका आयुष्य भरडलं गेलेल्या स्त्रीची कथा ‘मुडकं कुंपण’ मधून वाचायला मिळते. समाजातील दांभिकतेवर परखड भाष्य करणारी आणि हृदय पिळवटून टाकणार्या घटना प्रसंगातून गावजीवनाचं, त्यातील स्त्रिजीवनाचं अस्वस्थ चित्रण करणारी ही कादंबरी आहे.
दरम्यान, या आधी रवींद्र पांढरे यांच्या अवघाची संसार, पोटमारा आणि सायड या कादंबर्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या अवघाची संसार या कादंबरीवर आधारीत घुसमट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर पोटमारा या कादंबरीचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात ( एम.ए.) समावेश करण्यात आला आहे.