यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दहीगाव येथील प्रमुख चौकासह गावाबाहेरील रस्त्यापर्यंत चिखलामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन यामुळे पादचारी, वाहन धारकांसह, शाळकरी विद्यार्थ्यांना येणे-जाणे अवघड झाले आहे.
सावखेडा सिम येथील विद्यार्थ्यांना दहीगाव येथे जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत व आदर्श विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी यावे लागते. या चिखलामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून पायी चालणे जिकरीचे झालेले आहे. तसेच दहिगाव येथील प्रमुख चौकात बस थांब्याजवळ पावसाळ्यात प्रवाशांना एसटी व इतर प्रवासी वाहनाची वाट बघण्यासाठी बराच वेळ थांबावे लागते, या घाणीच्या दुर्गंधीमुळे उभे राहणेही कठीण झाले आहे. गावाबाहेर असलेले उकिरडे, चिखल, खड्ड्यांमध्ये साचलेले घाण पाणी यामुळे गावात रोगराई पसरण्याचीही शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहेत.
दरम्यान, यावल पासून विरावली, दहीगाव, सावखेडा सिम, मालोद या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर झालेले आहे, मात्र सावखेडा सिम ते दहिगावपर्यंतच डांबरीकरण संबंधित ठेकेदाराने केलेले आहे. रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तीन किलोमीटर रस्ता डांबरीकरण होणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात रस्ता दोन किलोमीटरच्या आतच झालेला असल्याने या अपुर्ण झालेल्या कामाबद्दल परिसरातील ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.