जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश येत असून दोन दिवसांपासून कृषिपंपांना सलग ८ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आहे.
वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश येत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजेनंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने विजेचे भारनियमन केले नाही. सुरळीत वीजपुरवठ्याची ही स्थिती शनिवारी (दि. १६) सायंकाळपर्यंत कायम होती. तसेच गेल्या दोन दिवसांपासून कृषिपंपांना दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे व तो कायम ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे. परंतु महावितरणकडून करण्यात आलेल्या वेगवान प्रयत्नांमुळे अतिरिक्त स्वरुपात वीज उपलब्ध झाली आहे. तसेच खुल्या बाजारामधून (पॉवर एक्सचेंज) २००० मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवार (दि. १४) पासून राज्यातील वीजपुरवठ्याच्या स्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. महावितरणच्या या प्रयत्नांच्या फलश्रृतीमुळे राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरु राहील यासाठी महावितरण पूर्ण प्रयत्न करीत आहे. तसेच राज्यात शुक्रवारी (दि. १५) सकाळी ७ वाजेनंतर कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करावे लागले नाही. सुरळीत वीजपुरवठ्याची हीच परिस्थिती दि. १६ रोजी सायंकाळपर्यंत कायम होती, हे विशेष.
राज्यातील विजेचे तात्पुरते भारनियमन कोणत्याही परिस्थितीत टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेगाने व ताबडतोब करण्याची सूचना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. त्याप्रमाणे अतिरिक्त स्वरुपात वीज उपलब्ध करण्यासोबतच उन्हाचा तडाखा सुसह्य करण्यासाठी भारनियमन टाळण्याची दक्षता घेण्यात येत आहे. सोबतच महानिर्मिती कंपनीला जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे वीज परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजनांसह महावितरणने मुख्यालयासह सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी २४ तास सुरु असणारे वॉर रुम सुरु केले आहेत. त्यासाठी अभियंता व अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाला होता. त्यावेळी महावितरणने अथक प्रयत्नांती ऐन उष्म्यात राज्यातील भारनियमन टाळण्यात यश मिळविले होते. परंतु आताच्या कोळसा टंचाईची व्याप्ती मोठी असल्याने वीज निर्मितीला देखील मोठा फटका बसला आहे. त्या प्रमाणात मात्र अतिरिक्त स्वरुपातील वीज उपलब्ध करण्याच्या वेगवान प्रयत्नांना यश आल्याने भारनियमनाची तीव्रता वाढली नाही. याउलट अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात महावितरणला यश आले आहे व कृषिपंपांचा वीजपुरवठा देखील पूर्ववत करण्यात आला आहे.
सध्या विजेच्या भारनियमनाची स्थिती ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. ती टाळण्यासाठी किंवा अतिशय कमीत कमी राहील याची महावितरणकडून सर्वतोपरी दक्षता घेण्यात आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये ‘कोरोना’च्या तीव्र प्रादुर्भावात महावितरणने जीवाची बाजी लावत अखंडित वीजपुरवठा केला आहे. अवघ्या १२ ते २४ तासांमध्ये राज्यातील मोठी रुग्णालये, ऑक्सिजन प्रकल्पांना नवीन वीजजोडणी व वाढीव वीजभार देण्याची कामगिरी बजावली आहे. ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळांमध्ये सुमारे १ कोटी १० लाख ग्राहकांचा वीजपुरवठा रात्रंदिवस, अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे अल्पावधीतच पूर्ववत केला आहे. आता देखील कोळसा टंचाईमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा केली आहे. ही तात्पुरत्या भारनियमनाची स्थिती लवकरच संपुष्टात येईल. तोपर्यंत सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.