भडगाव प्रतिनिधी | अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, आणि यासाठी कुणीही वंचीत राहता कामा नये, अशा सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी येथील आढावा बैठकीत दिल्या.
याबाबत वृत्त असे की, येथील तहसील कार्यालयात खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगे ते म्हणाले की, कजगाव, पासर्डी, घुसर्डी, भोरटेक, तांदळवाडी, उंबरखेड यासह परिसरात मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे करताना एकही अतिवृष्टीग्रस्त वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने स्थानिक सरपंच, कार्यकर्त्यांची मदत घेऊन प्रत्येकाच्या नुकसानीचे पंचनामे करावे. कोकणच्या धर्तीवर मदत मिळावी. यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. पण पंचनामा झाला नाही म्हणून भरपाईपासून कोणी वंचित राहू नये.
यासोबत महसूल प्रशासनाने फक्त नदीकिनारी असलेल्या नुकसानग्रस्त यांच्या सोबत गावात नुकसान झाले असेल तर त्याचाही पंचनामा करावा. लहान- मोठे व्यावसायिक, विविध आस्थापना या नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना खासदार पाटील यांनी दिल्या. .
बैठकीला तहसीलदार मुकेश हिवाळे, गटविकास अधिकारी जी. ए. वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, माजी जि.प. सभापती पोपट भोळे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, सहाय्यक बीडीओ अतुल पाटील, तालुका कृषी अधिकारी बी.बी. गोर्डे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य सोमनाथ पाटील, पाचोरा भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजप तालुकाध्यक्ष अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.