मुंबई । कोरोनाच्या संसर्गानंतर उपचार घेऊन परतलेल्या नवनीत राणा यांचा करोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्टही नव्याने पॉझिटीव्ह आला आहे.
खासदार नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईमधील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. १६ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर त्या २० दिवसांसाठी क्वारंटाइन राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्यांची आज पुन्हा चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
६ ऑगस्ट रोजी नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. त्यापूर्वी त्यांच्यावर नागपूरमधील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. पण तिथे त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला आणण्यात आणण्यात आलं होतं. राणा यांनी १५ ऑगस्टला एक व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असून आयसीयूमधून आता सामान्य कक्षात आणण्यात आलं असल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासोबत त्यांचे पती रवी राणा यांचा रिपोर्टही पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे.