अहमदनगर (वृत्तसेवा) अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोदींचं व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरू होतं. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखले. त्यावर गांधी यांनी चिडून मी अजून बोलणार आहे. मला दोन मिनिटे बोलू द्या, अशा शब्दांत त्यांनी बेरड यांना सुनावलं.
सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अहमदनगरमध्ये सभा घेण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी राज्यातील, तसेच स्थानिक नेत्यांची भाषणं झाली. खासदार दिलीप गांधी हे आपल्या भाषणातून विकासकामांबद्दल जनतेला माहिती देत असतानाच जिल्हाध्यक्ष बेरड यांनी त्यांना भाषण थांबवायला सांगितलं. याप्रकाराने दिलीप गांधी हे प्रचंड चिडले. मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही, असं म्हटलं जातं. पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे, असं म्हणत त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. व्यासपीठावरील माइक मिनिटभरासाठी बंद होता. गांधींनी खडे बोल सुनावल्यानंतर बेरड व्यासपीठावरून बाजूला गेले. त्यानंतर गांधी यांनी भाषण केलं. त्यात त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली.