मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या निमित्ताने विविध समस्यांबाबत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला आणि निवासी तहसीलदार डॉ. अनिकेत वाळे यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकरी आणि शेतमजूर धोरणातील अन्याय: निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न करता सरकारने लाडकी बहिण योजनेत घुमजाव करून अनेक लाभार्थींना अपात्र ठरवले. वीज बिल माफी आणि कर्जमाफी: सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शेतमाल खरेदी आणि कृषी धोरणे: शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किमतीत खरेदी न करता त्यांना आर्थिक अडचणीत टाकले जात आहे. रासायनिक खते, बियाणे, कृषी अवजारे वरील जीएसटी: निवडणुकीत जीएसटी मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु आजतागायत त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य डॉ. जगदीश पाटील, तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भोईसर, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, सांस्कृतिक सेलचे गुलाबराव महाराज, एससी सेल जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. गवई, भाऊराव महाजन, शिवाजी पाटील, किसान सेल तालुकाप्रमुख संजय चौधरी, तालुका उपाध्यक्ष नामदेवराव भोई, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष आरिफ रब्बानी, समाधान पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसच्या नेत्यांनी या आंदोलनातून सरकारला इशारा दिला की, जर लवकरच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल. यामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.