जळगाव (प्रतिनिधी)। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ तथा आयटक शाखेतर्फे आशा गटप्रवर्तक स्त्री परिचर आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज (मंगळवार) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेची अमलबजावणी योग्यरीतीने व्हावी, यासाठीच्या नाराजीसह अन्य मागण्यांचे एक निवेदन आज जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आणि उपमुख्य अधिकारी यांना देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद कार्यालयासमोर ऑनलाइन पगार मिळावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलनही केले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०१७ पासून राहणीमान भत्यासह पगार मिळालेला नाही, फक्त किमान वेतनच शासनाकडून मिळणार आहे. सहा शासनामार्फत वेतन ऑफलाईन मिळाले आहे, त्यातही बाहेरील कर्मचाऱ्यांचा कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे. ऑक्टोबर २०१८ पासून ऑनलाईन पगार करावेत म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हजेरी व पीएफ सर्विस बुक आतील योग्य माहिती संगणकाद्वारे अपडेट करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मोजक्याच पंचायतींनी माहिती अपडेट केली पण त्यांनाही अद्याप पगार मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. चहार्डीसारख्या अनेक पंचायती आहेत की, त्यांनी २० महिन्यांपासून पगार दिलेला नाही, म्हणून आज जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तसेच विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात अतुल महाजन, राजेंद्र कोळी, मलखान राठोड, संदीप देवरे, कृष्ण महाजन, शेख अमजद शेख आणि सुभाष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध गावच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.