जळगाव, (प्रतिनिधी): शहरात खड्ड्यामुळे रोजच छोटे मोठे अपघात होत आहेत. या अपघातात उद्योजकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. शहरातील शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी कॉंग्रेसतर्फे बुधवार १७ जुलै रोजी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर जन आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांसह प्रत्येक गल्ली मोहल्यातील रस्त्यांचा चोथा झाला आहे. शहरातील नागरिकांना अनेक व्याधी जडत आहेत.परवाच समाजसेवक, उद्योजक स्व. अनिल बोरोलेजी यांचा चित्रा चौक या मध्यवर्ती भागात खड्डयांमुळे अपघाती म्रृत्यू झाला. कर भरणाऱ्या जळगावकरांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्याच्या विरोधात जळगाव शहर जिल्हा काँग्रेस तर्फे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत. तरी सर्व त्रस्त,जागरूक जळगावकरांनी ३ ते ६ दरम्यान मनपा इमारतीबाहेर गेटवर समर्थन देण्यासाठी जरूर उपस्थित रहावे,असे आवाहन जळगाव शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांनी केले आहे. आमदार राजुमामा भोळे यांनी जळगावकरांना चीड येते ना खड्ड्याची ? असा प्रश्न उपस्थित करत मतदान मागितले होते. मात्र, ५ वर्षात त्यांनी ही चीड तुमच्यावर काढायची का ? असा प्रश्न डॉ. चौधरी यांनी उपस्थित करून आंदोलन छेडले आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडीयाचा पोस्ट शेअर केली आहे.