Home क्राईम मोटारसायकल चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात ; दुचाकी हस्तगत

मोटारसायकल चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात ; दुचाकी हस्तगत


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाढत असलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. मोटारसायकल चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरी गेलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

जळगाव तालुक्यातील धानोरा खुर्द येथील रहिवासी शालिक पाटील हे आपल्या मालकीची हिरो होंडा सुपर स्प्लेंडर (MH 19 AK 0207) ही दुचाकी घेऊन कामानिमित्त जळगाव शहरातील काशिनाथ चौक परिसरात आले होते. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क करून खरेदीसाठी गेल्यानंतर परत आल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी वाहन आढळून आले नाही. अज्ञात इसमाने दुचाकी चोरल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 66/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर जाधव व राजेंद्र पाटील यांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला.

दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांनी आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. सदर गुन्हा त्याने आपला साथीदार गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) याच्यासोबत केल्याचे उघड केले. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ही यशस्वी कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हवालदार प्रमोद लाडवंजारी, हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील, नायक प्रदीप चौधरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, राहुल घेटे व योगेश घुगे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस नायक प्रदीप चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून एमआयडीसी पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.


Protected Content

Play sound