जळगाव (प्रतिनिधी) भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरातून भगवान परशुरामांच्या जयघोषात मोटारसायकल व चारचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी हातात भगव्या पताका घेऊन व पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. रविवारी शहरातून निघालेल्या भव्य अशा मोटारसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त श्री भगवान परशुराम सेवा समिती व बहुभाषिक ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आज सकाळी महाबळमधील संत गाडगेबाबा चौकापासून रॅलीला सुरुवात झाली. शहरातून निघालेल्या दुचाकी रॅलीच्या मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. सामाजिक संस्था व समाजबांधवांतर्फे फुलांच्या वर्षावात रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोटारसायकल रॅलीच्या अग्रभागी बुलेट स्वार हाते. त्यानंतर ओपन जीपवर भगवान श्री परशुराम यांची प्रतीमा ठेवण्यात आली होती. तसेच रॅलीमध्ये भगवे फेटे व भगव्या टोपी घालून हातात भगवे ध्वज घेऊन समाजबांधव सहभागी झाले होते. यामध्ये पुरुषांसह महिलांची संख्यादेखील लक्षणीय होती. यावेळी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे,श्री परशुराम सेवा समितीचे पदाधिकारींसह रॅलीमध्ये हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.