भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील शनि मंदिर वॉर्डात काल रात्री उशीरा आई व मुलावर पूर्व वैमनस्यातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील शनि मंदिर वॉर्डातील बेबाबाई लक्ष्मण चौधरी आणि त्यांचे पुत्र जीवन लक्ष्मण चौधरी ( वय ३१) यांच्यावर कोयत्याने हल्ला लढविण्यात आला. हल्लेखोरांनी पहिल्यांदा मच्छी मार्केटच्या गेटजवळ जीवन चौधरी यांना जखमी केले. यानंतर त्यांनी लागलीच घरी जाऊन बेबाबाई चौधरी यांच्यावर हल्ला चढवून पळ काढला. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली.
दरम्यान, या हल्ल्यात दोन्ही जण जखमी झाले आहेत. यापैकी बेबाबाई चौधरी यांना प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर जीवन चौधरी यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व धर्मार्थ रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.