कुसुंबा गावातील ‘त्या’ अपघातात तरूण मुलानंतर आईचाही उपचारादरम्यान मृत्यू; रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश !

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुसुंबा गावाजवळील बसस्थानकाच्या परिसरात भरधाव वेगाने पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार दिल्याने अविनाश हरीचंद्र पाटील या १९ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडला होता. तर त्यांची आई प्रमिला हरीचंद्र पाटील (वय-४० रा. कुसुंबा ता. जळगाव) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शनिवारी २२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात अविनाश पाटील हा आई वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. फोटोग्राफीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, १७ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता अविनाश हा त्याची आई प्रमिला हरीचंद्र पाटील यांच्यासोबत दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाला होता. त्यावेळी गावातील बसस्थानकाजवळ भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात अविनाश पाटील यांचा जागेवरचा मृत्यू झाला होता. तर त्यांची आई प्रमिला पाटील या गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, प्रमिला पाटील यांच्यावर जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना शनिवारी २२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता. रविवारी २३ जून रोजी सकाळी १० वाजता नातेवाईकांनी ट्रँकर चालकावर कठोरात कठोर कारवाई आणि नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात विवाहित मुलगी आणि पती असा परिवार आहे. या घटनेमुळे कुसुंबा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content