पहूर (ता. जामनेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील सांगवी शिवारातील वाघमाऱ्या नाल्यावर सुमारे २२ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली मोरी पहिल्याच पुरात कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मोरीच्या दोन्ही बाजूंचा भराव पूर्णपणे वाहून गेला असून, शेतकऱ्यांची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. केवळ वर्षभरातच मोरी निकामी ठरल्याने कामाच्या निकृष्टतेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.

या नाल्यावरून अनेक शेतकरी दररोज शेतीसाठी ये-जा करतात. त्यामुळे गतवर्षी शासनाकडून २२ लाख रुपये निधी मंजूर करून येथे काँक्रीट मोरी उभारण्यात आली होती. मात्र या मोरीवरून ट्रॅक्टरही पार होत नसल्याने मालवाहू वाहनांची चालना तर अशक्यच झाली आहे. या मोरीच्या दोन्ही बाजूचा भराव पुरात वाहून गेल्यामुळे तिची रचना धोकादायक बनली आहे.

या प्रकरणी शेतकरी संजय जाधव यांनी निकृष्ट कामासाठी संबंधित अभियंता आणि ठेकेदार यांची चौकशी करावी, तसेच दोषी ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी जोरदार मागणी केली आहे. यावेळी वाहून गेलेला भराव प्रत्यक्ष दाखवण्यासाठी शेतकरी अशोक जाधव, किशोर पाटील, राहुल बनकर हेही घटनास्थळी उपस्थित होते.
युवा शेतकरी राहुल बनकर यांनी विकास योजनांमध्ये वाढलेल्या कमिशनखोरीवर बोट ठेवत, “कामापेक्षा कमिशन महत्त्वाची झाली असून, त्यातच असा दर्जाहीन बांधकाम प्रकार घडतो. शासनाच्या लाखो रुपयांचा अपव्यय होतोय, पण जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला.
या घटनेमुळे संपूर्ण गावाचे लक्ष आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे लागले आहे. मोरीच्या निकृष्ट दर्जामुळे केवळ सरकारी निधी वाया गेला नाही, तर शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामावरही गंभीर परिणाम झाला आहे.



