जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात रविवारी मॉन्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
जिल्ह्यात रविवारी चोपडा, यावल या तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मिळताच त्यांनी या नुकसानीची तातडीने पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज सकाळपासूनच महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या गावांमध्ये जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
मॉन्सूनपूर्व पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल त्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात येईल, तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. मात्र, त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
—————————-