Home क्रीडा पहूरच्या मोहिनी राऊतची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

पहूरच्या मोहिनी राऊतची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

0
131

पहूर, ता. जामनेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पहूर गावातील कुशल तायक्वांदोपटू मोहिनी हरीभाऊ राऊत हिने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. राज्यस्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकावून मोहिनीने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची जोरदार छाप पाडली असून तिची प्रतिष्ठित नॅशनल तायक्वांडो फेडरेशन कप आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तायक्वांडो कप या दोन्ही राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे पहूर ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणारी आणि शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू असलेली मोहिनी राऊत सातत्याने उत्तुंग कामगिरी करत राज्याच्या तायक्वांदो क्षेत्रात नावारूपाला येत आहे. आज पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत तिने रौप्यपदकावर नाव कोरले. या यशामुळे राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही प्रमुख स्पर्धांसाठी तिची निवड निश्चित झाली आहे.

मोहिनीच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचा तायक्वांडो ऑफ महाराष्ट्राचे सचिव गफ्फार पठाण सर तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र जंजाळे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तर महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबूराव आ. घोंगडे, सर्व संचालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी मोहिनीच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि स्वयंप्रेरणेबद्दल मनःपूर्वक कौतुक व्यक्त केले.

गावातील शैक्षणिक संस्था आणि कुटुंबियांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोहिनीने पहूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवल्याचा अभिमान सर्वांना वाटत आहे. तिच्या या यशामुळे गावातील अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित होतील, असा विश्वास स्थानिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound