नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या शानदार विजयाने संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. मात्र या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं एक ट्विट पाकिस्तानला चांगलंच जिव्हारी लागलं असून, पाकिस्तानच्या नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेषतः भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत केलेल्या या ट्विटने शेजारी देशाला चपखल प्रत्युत्तर मिळालं असल्याचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत करत आशिया कपवर नवव्यांदा आपलं नाव कोरलं. देशभरात विजयाचा उत्सव साजरा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी एक्स (पूर्वीचा ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत लिहिलं, “खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच लागला. भारताने पुन्हा विजय मिळवला. आमच्या क्रिकेटर्सना शुभेच्छा.” या शब्दांमध्ये भारताच्या क्रीडाविजयानंतरचा आत्मविश्वास तर होता, पण त्याचवेळी पाकिस्तानला भूतकाळातील काही कटू वास्तवांची आठवणही करून देणारा एक स्पष्ट संदेश होता.

पंतप्रधान मोदींच्या या ट्विटनंतर पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या ट्विटवर त्वरित प्रतिक्रिया देत लिहिलं की, “मोदी उपखंडातील क्रिकेट संस्कृती व भावना नष्ट करत आहेत. त्यांनी शांतता व चर्चेची शक्यता संपवली आहे.” हा प्रतिसाद केवळ एक राजकीय प्रतिक्रिया नसून, भारताच्या विजयाने पाकिस्तानात निर्माण झालेल्या अस्वस्थतेचंही प्रतिबिंब आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ख्वाजा आसिफ यांना भारताकडून क्रिकेटच्या विजयावरून ‘शांतता धोक्यात आल्याचं’ वाटलं, मात्र त्याचवेळी पाकिस्तानमधील दहशतवादी हालचालींबाबत ते काहीच बोलले नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताने पाकिस्तानातील अनेक टेरर कॅम्प नष्ट केले होते. चार महिन्यांनंतरही पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा भागात पुन्हा टेरर कॅम्प उभारत असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. हे वास्तव लक्षात घेता, पाकिस्तानकडून शांततेचा आव आणणे हा एकप्रकारचा ढोंगीपणा असल्याची टीका होत आहे.
याच दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी देखील मोदींच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली. नकवी यांनी लिहिलं, “खेळात युद्धाला ओढणं हा खेळ भावनेचा अपमान आहे.” मात्र याच नकवी यांच्याविरोधात भारतीय संघाने आशिया कप विजयानंतर ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मैदानात ट्रॉफी घेऊन जाणारे नकवी यांची कृती आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया, दोन्हीही पाकिस्तानच्या असंतुलनाचं प्रतीक असल्याचं जाणकारांचे मत आहे.
भारताच्या या क्रीडाविजयानंतरचा राजकीय आणि सामाजिक परिणाम केवळ देशांतर्गत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणवू लागला आहे. पंतप्रधान मोदींच्या एका ट्विटमधून भारताने केवळ खेळातच नव्हे तर शब्दांतूनही प्रभावी डाव साधला आहे.



