नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून पुन्हा मोदी सरकार सत्तेत येताना दिसत आहे. नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्यांवरुन नेहमी चर्चेत असतात. ते विविध देशांना भेट देऊन विविध मार्गाने भारताशी जोडण्याच्या प्रयत्नात दिसतात. त्यामुळे आता तिसऱ्या टर्ममध्ये मोदी कोणत्या देशांना भेट देणार? याबद्दल उत्सुकता आहे. याचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी कोणत्या देशात सर्वप्रथम जातील याची माहिती आली आहे.
पंतप्रधान पदाची शपथ झाल्यानंतर मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी इटलीला जाणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या पंतप्रधानांना जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. ते पंतप्रधानांनी स्वीकारले आहे. 13 ते 15 जून दरम्यान इटलीमध्ये जी-७ देशांची शिखर परिषद होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी देशाचे प्रतिनिधित्व करतील. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली.
मोदींनी गुरुवारी इटालियन पंतप्रधान मेलोनी यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान इटलीतील पुगलिया येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.यावर्षी इटलीला जी-७चे अध्यक्षपद मिळाले आहे. या शिखर परिषदेत जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल आणि रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम, इस्रायल आणि हमासमधील संघर्ष यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जी-७ देशांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूके आणि यूएस यांचा समावेश आहे, युरोपियन युनियन अतिथी म्हणून चर्चेत सहभागी आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर जी-७ नेत्यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा संपल्यानंतर भारताचा राजनयिक कार्यक्रम खूप व्यस्त असणार आहे. जी-७ च्या आधी, परराष्ट्र मंत्री ११ जून रोजी रशियात होणाऱ्या ब्रीक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ब्रीक्स शिखर परिषदेच्या तयारीसाठी उपस्थित राहणार आहेत. भारतीय पंतप्रधान जूनच्या शेवटच्या आठवड्यात बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांचे यजमानपद भूषवणार आहेत. त्यानंतर जुलैमध्ये कझाकस्तानमध्ये एससीओ शिखर परिषदेत उपस्थित राहतील. येथे ते निवडणुकीनंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटण्याची शक्यता आहे.