नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, यादरम्यान आज मोदींच्या हस्ते नाशिक येथे राष्ट्रीय युवा मोहत्सवाचं उद्घाटन होणार आहे, यापूर्वी नाशिकच्या तपोवण येथे मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं अयोध्येतील राम मंदिराचं स्पप्न देखील पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदेंनी महाराष्ट्राच्या कुंभ नगरीत पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. तसेच त्यांनी राष्ट्रीय युवा मोहत्सवाचं आयोजन नाशिकमध्ये करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार देखील मानले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रभु राम आणि लक्ष्मण सीता मातेला घेऊन गोदावरीच्या किन्याऱ्यावर पंचपटीत आले होते. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धर्तीवर पंतप्रधान आले ही आनंदाची बाब आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अयोध्येत भव्य राम मंदीराचे निर्माण व्हावे हे कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न आणि बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं आहे. त्यांचे आभार मी शब्दात मानू शकत नाही, एवढंच सांगेन की ‘मोदी है तो मुमकिन हैं!’ आपले मोदीजी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये भूकंप आला. आता आपल्या देशाकडे वाइट नजरेने पाहण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही, हे फक्त आपल्या पंतप्रधान मोदींमुळे, आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगात गाजत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आपल्या देशाचं नाव आता जगभरात सन्मानाने घेतलं जात आहे. जी२० होत आहे, चांद्रयान यशस्वी अभियान होत आहे. त्यामुळे अनेक देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आपल्या पंतप्रधानांसोबत सेल्फी घेत आहेत, कोणी बॉस म्हणतंय, कोणी वाकून नमस्कार करत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपला देश महासत्ता बनण्याकडे जात आहे हे पाहून छाती गर्वाने फुलून येते असेही एकनाथ शिंदे म्हणाले.