अरेच्चा : मोदी-सोनियांनी एकाच सेंटरवर घेतली कोरोनाची लस !

पाटणा वृत्तसंस्था | सरकारी कामातील घोळातून अनेक गमती-जमती समोर येत असतात. बिहारमधील एका कोरोना लसीकरणाच्या सेंटरवर असलाच एक धमाल प्रकार समोर आला आहे.

बिहारच्या अरवल जिल्ह्यात आरोग्य विभागाने केलेला प्रताप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अरवलमधल्या करपी एपीएचसीमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींची यादी पुढे आली आहे. ही यादी आरोग्य विभागानं तयार केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांची नावं आहेत. या एका यादीनं बिहारच्या आरोग्य विभागातील घोळ समोर आणला आहे. या यादीत मोदी, शाह, सोनिया यांचे फोन नंबरही देण्यात आले आहेत. अर्थात, येथे कागदोपत्री लसीकरण दाखविण्यात आल्याची बाब स्पष्ट झाल्याने शासकीय गोंधळ जगासमोर आला आहे.

दिग्गजांची नावं असलेली बोगस यादी समोर येताच आरोग्य विभागात खळबळ माजली. राज्य आरोग्य समितीनं आरोग्य विभागाला चांगलंच फैलावर घेतलं. यादी समोर येताच दोन डेटा ऑपरेटर्सना कामावर काढून टाकण्यात आलं. आरोग्य आयोजकांच्या सांगण्यावरूनच आपण अशा प्रकारची माहिती यादीत समाविष्ट केली असा दावा त्या दोघांनी केला. मात्र हा अतिशय गंभीर प्रकार असून यावर कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी आता केली जात आहे.

Protected Content