नवी दिल्ली वृत्तसंस्था । गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्या बाजूला बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्वॉरंटाईन होणार का ? असा प्रश्न युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी केला आहे.
कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाची चाचणी करुन स्वत: होम क्वारंटाईन होणार का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी याबाबात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, बुधवारी (२९ जुलै) झालेल्या कॅबिनेट बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान शेजारी बसले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का? की नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत, असा सवाल श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे.
५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे आता अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याने नरेंद्र मोदी यांना क्वारंटाईन करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र तरीही राम भूमीपूजनात कोणताही बदल करण्यात आल्याचे सांगितले गेले नसल्याने, हा सोहळा होणारच हे स्पष्ट करण्यात आले आहे.