रायपूर (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपाची विचारसरणीच बदलून टाकली आहे. मोदी-शहा म्हणजे सत्तेची लालसा असणारे गुंड, अशी जहरी टीका देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणीने केली आहे.
बाराबंकी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना करुणा शुक्ला यांनी मोदी आणि अमित शहांवर घणाघाती टीका केली. शुक्ला यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपाकडून अटलजी, अडवाणीजी आणि भाजपाच्या विचारसरणीशी तडजोड केली जात आहे. राष्ट्रवाद हाच सध्या भाजपा आणि आरएसएससाठी राजकारणाचा मुद्दा बनला आहे. मोदी आणि शहा यांच्याकडून भारत माता की जय, वंदे मातरम यांसारख्या मुद्द्यांवरुन देशभक्तीचे राजकारण केले जात आहे. पण, त्यांच्यासाठी भगवा झेंडाच तिरंगा असतो. कारण, त्यांच्याकडून मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी नागरिकांचे लक्ष अशा मुद्द्यांकडे वळवले जाते, असेही शुक्ला यांनी म्हटले.