रांची (वृत्तसंस्था) २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातून काळा पैसा आणून सर्व भारतीयांच्या खात्यात १५-१५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय प्रत्येक वर्षी तीन लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरोधात रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
झारखंड उच्च न्यायालयाचे वकील आणि डोरंड येथील रहिवासी हरेंद्र कुमार सिंह यांनी हा खटला दाखल केला आहे. याचिकेत पुढे म्हटले आहे की, मोदींनी ७ नोव्हेंबर २०१३मध्ये छत्तीसगड येथे हे आश्वासन दिले होते. लोकांची फसवणूक करून त्यांनी बहुमत मिळवले होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही हेच आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी शहा यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना हा चुनावी जुमला होता आणि केवळ निवडणुकीत बोलायचे म्हणून ही घोषणा केली होती, अशी कबुली दिली होती. त्यासाठी तक्रारदाराने २१ डिसेंबर २०१९ रोजी अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा हवालाही दिला आहे. रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंवरही असाच आरोप करण्यात आला आहे. आठवले यांनी १८ डिसेंबर २०१८ रोजी महाराष्ट्रातील सांगलीमध्ये जनतेशी संवाद साधताना काळापैसा आल्यावर लोकांना १५-१५ लाख रुपये मिळतील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनीही जनतेची फसवणूक केली असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.