जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतात कोरोना काळात मृत पावलेल्या ४७ लाख २९ हजार ५९८ व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये अशी मदत मोदी सरकारने करावी अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे केली.
मोदी सरकारने भारतात दोन वर्षाच्या काळात केवळ ५ लाख ४७ हजार ७५१ व्यक्ती मृत पावले असा आकडा समोर ठेवलेला असून प्रत्यक्षात ४७ लाख २९ हजार ५९८ इतके व्यक्ती कोरोना काळात मृत पावल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. त्यामुळे मोदी सरकारने कोरोना काळातील मृत लोकांप्रती तरी माणुसकी दाखवत कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये अशी मदत मोदी सरकारने करावी अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे केली.
या पत्रकात, “दोन वर्षांपूर्वी जेव्हा जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार होत होता आणि भारतामध्ये त्यावेळेस एकही रुग्ण अजून सापडलेला नव्हता अशा काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळविले होते की जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार फार झपाट्याने होतो आहे; हा आजार अतिशय गंभीर असून आपण तात्काळ भारतामध्ये हा आजार येणार नाही यावरती तात्काळ उपाययोजना करावी, तसेच आंतरराष्ट्रीय वाहतूक ही तात्काळ बंद करण्यात यावी जेणेकरून कोरोना हा भारतामध्ये येणार नाही.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राकडे दुर्लक्ष करून ‘नमस्ते ट्रम्प’ सारख्या कार्यक्रमांना महत्त्व देत जनतेच्या जीवाशी खेळ केला. शेवटी कोरोना हा भारतामध्ये दाखल झाला. गेली दोन वर्षे कोरोना काळामध्ये असंख्य असे मृत्यू भारतामध्ये झाले.
परंतु इथंपर्यंत ही मोदी सरकारचा खोटारडेपणा न थांबता जिवंतपणी तर मोदी सरकारला थोडी देखील जनतेची माणुसकी नव्हती, परंतु कोरोना काळामध्ये मृत पावलेल्या लोकांचा आकडा देखील प्रसिद्धी माध्यमांच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर खोट्या पद्धतीने मांडण्यात आला.
नुकताच (डब्ल्यू एच ओ) जागतिक आरोग्य संघटनेने ५ मे २०२२ रोजी एक अहवाल सादर केला. ज्यात त्यांनी भारतामध्ये कोरोनाच्या काळामधील दोन वर्षांमध्ये ४७ लाख २९ हजार ५९८ इतके व्यक्ती कोरोना काळात मृत पावल्याचे नमूद केले आहे. परंतु केंद्र सरकारने ‘खोटे बोला परंतु रेटून बोला’ या तत्वानुसार या मोदी सरकारच्या पॉलिसीच्या अंतर्गत भारतामध्ये दोन वर्षाच्या काळामध्ये केवळ ५ लाख ४७ हजार ७५१ व्यक्ती मृत पावले असा खोटा आकडा समोर ठेवलेला आहे.
त्या अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही मोदी सरकारचा खोटारडेपणा हा जनतेसमोर आणतो आहोत.” असे नमूद केले आहे.
यात ‘त्यांनी आता तरी कोरोना काळात मृत पावलेल्या व्यक्तीचे आकडे लपवू नयेत डब्ल्यूएचओ जागतिक आरोग्य संघटनेने जे काही अहवालाद्वारे जे काही आकडे दाखवले आहेत ते जनतेसमोर स्पष्टपणे मांडावेत व कोरोना काळामधील ४७ लाख लोकांचा जो काही जीव गेलेला आहे. या ४७ लाख लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये अशी मदत मोदी सरकारने करावी.’ अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे केली.