दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी सूर्यग्रहण बघण्यासाठी आपण किती उत्सुक होतो, याची माहिती ट्विटर हँडलच्या माध्यमातून दिली. पण दिल्लीमध्ये ढग असल्यामुळे सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता न आल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. देशाच्या मोठ्या भागातून आज सकाळी झालेले सूर्यग्रहण बघता आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सूर्यग्रहणाबाबतची माहिती दिली. देशातील नागरिकांप्रमाणे मी देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्साही होतो. मात्र, ढगाळ वातावरणामुळे मला थेट सूर्यग्रहण पाहता आलं नसल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मात्र, लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कोझीकोडे आणि देशातील इतर ठिकाणचे सूर्यग्रहण पाहिले आणि तज्ञांकडून या खगोलीय घटनेबाबत अधिक माहिती घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. सूर्यग्रहणाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि ही माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी नागरिकांनी, विज्ञानप्रेमींनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी बच्चे कंपनींचा उत्साह ओसांडून वाहत आहे.