नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदींचा उल्लेख अडाणी आणि सडकछाप माणूस असा केला आहे.
माजिद मेमन मोदींवर टीका करताना म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडाणी, सडकछाप माणसासारखे बोलतात, असे मला वाटते. ते एवढ्या मोठ्या पदावर बसले आहेत, त्यांचे पद घटनात्मक पद आहे. अशा पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही. तसेच जनता थेट पंतप्रधानाची निवड करत नाही. तर जनतेकडून निवडलेले खासदार पंतप्रधानाची निवड करतात. यावेळीसुद्धा सर्वात मोठा पक्ष पंतप्रधानाची निवड करणार आहे.” राजकारण्यांकडून भाषा आणि वर्तनाच्याबाबतीत चांगल्या आचरणाची अपेक्षा केली जाते. एक आदर्श व्यक्ती म्हणून जनता अशा राजकारण्यांकडे पाहत असते, त्यांच्या कृतीचे अनुकरण करत असते. मात्र हल्लीच्या काळात नरेंद्र मोदी विरोधकांवर टीका करताना भाषेची मर्यादा विसरत चालले आहेत. त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे, अशी टीकाही माजिद मेमन यांनी केली.