सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्ता मिळवणारे मोदी ठरले तिसरे किमयागार !

20190504 ASP002 0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतात सत्ता मिळवण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्य केली आहे. यूपीएच्या १० वर्षांच्या राजवटीनंतर २०१४मध्ये पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले होते. यानंतर या निवडणुकीत मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी नोंदवली आहे.

 

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९५१-५२मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेतील जवळपास तीन चतुर्थांश (४८९ पैकी ३६४) बहुमत मिळवले होते. यानंतर झालेल्या १९५७ व १९६२ च्या निवडणुकाही नेहरुंनी पूर्ण बहुमताने जिंकल्या होत्या. नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९५७ मध्ये ३७१ तर १९६२ मध्ये ३६१ जागा जिंकल्या होत्या.

इंदिरा गांधींचेही यश :-  इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९६७ मध्ये ५२० पैकी २८३ जागा जिंकून सत्ता राखली होती. काँग्रेसमध्ये दुफळी पडल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील गटाने १९७१ च्या निवडणुकीत ३५२ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतात सत्ता मिळवली होती.

मोदींचा करिष्मा :- यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात सरकारवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित एनडीएने २०१४ मध्ये सत्ता मिळवली. त्यावेळी एनडीएला ३३६ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत याची पूर्ण बहुमताची पुनरावृत्ती करत नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांधी यांच्या पंक्तीत बसले आहेत.

Add Comment

Protected Content