Home प्रशासन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्टेशनवर मॉक ड्रिल 

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्टेशनवर मॉक ड्रिल 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात व्यापक मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. प्रवाशांची सुरक्षितता आणि यंत्रणांची तत्परता तपासण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या सरावामुळे स्टेशन परिसरात काही काळ सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर मॉक ड्रिल सकाळी ११ वाजता सुरू होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत राबविण्यात आला. या सरावात रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) जळगाव, गुप्तचर विभाग (आयबी), अग्निशामक दल, नगरपालिका रुग्णालयाचे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता. विविध यंत्रणांमधील समन्वय आणि प्रतिसाद वेळ तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.

मॉक ड्रिलदरम्यान संभाव्य धोका, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षित बाहेर काढणी, जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देणे, तसेच अग्निशमन व सुरक्षा यंत्रणांची भूमिका यांचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी सतर्कतेने कार्यरत होते आणि प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात आली.

या मॉक ड्रिलमुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होणार असून, आपत्कालीन प्रसंगी विविध विभागांनी कशा पद्धतीने समन्वय साधावा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रवाशांमध्येही सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली.


Protected Content

Play sound