Home Cities जळगाव पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे ‘मोबाईल लाईट आंदोलन’ 

पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे ‘मोबाईल लाईट आंदोलन’ 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मोहाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचा पूर्ण अभाव आहे. या दैनंदिन अंधारामुळे रुग्ण, विशेषतः गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या या गंभीर दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक आगळावेगळं आंदोलन करत आवाज उठवला आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी मोबाईलचा लाईट सुरू ठेवत पथसंंचलन केलं आणि रस्त्यावरील काळोखात आपला निषेध प्रकाशात आणला. “विकासाच्या वल्गना करणाऱ्या शासनाच्या धोरणांना हा काळोख पुरेसा आहे,” अशी प्रतिक्रिया आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यांच्या मते, या रुग्णालयात १०० खाटांची सोय असून प्रसूती विभागही कार्यरत आहे, तरीही रुग्णालयाकडे जाणारा रस्ता रात्री अंधारात बुडालेला असतो.

शासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना रात्रौ अपघाताचा, चोरीचा आणि इतर धोक्याचा सामना करावा लागतो. या गंभीर स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने ‘मोबाईल लाईट आंदोलन’ छेडले. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या प्रकाशात चालत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा जाहीर निषेध केला.

या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, तसेच ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, चेतन पवार, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, राहुल चव्हाण, दीपक राठोड, ॲड. सागर शिंपी, हर्षल वाणी, ऐश्वर्य श्रीरामे, विकास पाथरे, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नागरिकांनीही मनसेच्या या उपक्रमाचे खुलेआम समर्थन करत “हे आंदोलन केवळ अंधारातील रस्ता नव्हे तर शासनाच्या दुर्लक्षाची वस्तुस्थिती उघड करते,” अशा शब्दांत कौतुक केले. रुग्णालयाच्या रस्त्यावर तातडीने पथदिवे बसवण्याची मागणी करताना मनसेने स्पष्ट इशारा दिला की जर प्रशासनाने त्वरीत उपाययोजना केल्या नाहीत, तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल.


Protected Content

Play sound