जळगाव, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ‘महाजनादेश’ यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १.३० च्या सुमारास त्यांची जळगाव शहरात सागर पार्कवर सभा होणार असून त्यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते त्यांना काळे झेंडे दाखवणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांनी कळवली आहे.
मुख्यमंत्री शहरात प्रवेश करून सभास्थळी जातील तेव्हा या मार्गावर कुठेतरी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विनोद शिंदे हे मनसेचे जुने कार्यकर्ते असून सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक राहिले आहेत. राज ठाकरे यांची आज (दि.२२) सक्तवसुली संचालनालयाने साडेआठ तास केलेली चौकशी, माजी गृहमंत्री चिदंबरम यांना झालेली अटक, जळगाव शहरातील समांतर रस्त्यांचा प्रश्न आणि हुडकोचे कर्ज भरताना ते आधी मनपाने भरावे, नंतर राज्य सरकार ते माफ करणार अशी घातलेली अट, या सगळ्यांचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.