मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे आणि शिवसेनेतील संघर्ष आज पुन्हा एका नव्या वळणावर आला असून शिवसेना भवनासमोरच मनसेने हनुमान चालीसा लाऊन डिवचले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर आता त्यांच्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज यांच्या निर्देशानुसार राज्यात आता मशिदींवरील भोंगे हटविण्याची मोहिम सुरू झाली आहे. मनसैनिकांनी ठिकठिकाणी भोंगे लावायला सुरुवातही केली. त्याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता शिवसेना पक्षाचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाच्या बाहेर लाऊडस्पीकर लावले आहेत. या लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली आहे.
यामुळे आता राम नवमीच्या दिवशीच मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने आधी घेतलेल्या प्रखर हिंदुत्वाची भूमिका आता राज ठाकरे यांनी घेतली असून याचा मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि नंतरच्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यातच आता मनसेने थेट शिवसेनेला आव्हान दिल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.